औरंगाबादमध्ये भाजपला आजी-माजी नगरसेवक देणार दगा ? धनुष्यबाण पेलवण्यास सज्ज.

Foto

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत कालपासून मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. भाजप समर्थक माजी महापौर गजानन बारवाल यांनी काल ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. म्हणायला ही सदिच्छा भेट असली तरी बारवाल यांची एक प्रकारे घर वापसी झाली आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह २० जणांचा एक मोठा गटही सेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत हा  गट शिवसेनेत येण्याची दाट शक्यता आहे. 

मागील पाच वर्षांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात मेगा भरती केली होती. राज्यातील सत्ता जाताच भाजपमधून सेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. एप्रिल २०२० मध्ये मनपाची सार्वत्रिक निवडणूक आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपमधील असंतुष्ट मंडळी सेनेच्या वाटेवर आहे. यामध्ये विद्यमान पाच नगरसेवकांचा समावेश आहे. २०१५ च्या मनपा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काही भाजप कार्यकर्ते आहेत. सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये गेलेले काही माजी नगरसेवकही पुन्हा सेनेचा धनुष्यबाण पेलवण्यास सज्ज झाले आहेत.

महापालिकेत ११ अपक्ष नगरसेवकांची मोट बांधून भाजपसोबत गेलेले माजी महापौर गजानन बारवाल आज सकाळी अचानक विमानाने मुंबईला गेले. त्यांनी थेट मातोश्री गाठली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांची उपस्थिती होती. यानंतर गजानन बारवाल यांनी सांगितले की, ही तर फक्त सदिच्छा भेट होती. 
बारवाल मातोश्रीवर दाखल होताच औरंगाबाद शहरात भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली. विद्यमान नगरसेवक, कार्यकर्ते एकमेकांकडे शंकेने बघू लागले. दुसऱ्या टप्प्यात आणखी २० जण सेनेत दाखल होणार असल्याची कुजबुज सुरू झाली. यामध्ये पाच आजी नगरसेवक, काही माजी नगरसेवक, मागील मनपा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक मोठा गट किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 


सेनेने किमान तिकिटाची हमी द्यावी
भाजपमधील एक मोठा गट सेनेत दाखल होणार आहे. पक्ष प्रवेशापूर्वी स्थानिक नेते, मुंबईच्या नेत्यांनी या कार्यकर्त्यांना किमान मनपा निवडणुकीत तिकीट देणार एवढे आश्वासन तरी द्यायला हवे. या मुद्यावर प्रवेश सोहळा दोन ते तीन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे कळते.

भाजपमध्ये तनवाणी यांच्या नाराजीचे कारण
भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड अलीकडेच करण्यात आली. मनपा निवडणुकीपर्यंत तरी शहराध्यक्षपद कायम राहील, असे तनवाणी यांना वाटत होते. मात्र, असे झाले नाही. मनपा निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून काही कार्यकर्त्यांचे पुनर्वसन त्यांना करता आले असते. ज्या विश्वासाने तनवाणी यांच्यासोबत कार्यकर्ते भाजपमध्ये आले होते, त्यांचे भवितव्य अधांतरी वाटू लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तनवाणी यांच्याकडे घर वापसीचा मुद्दा लावून धरला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker